दमा आणि कोव्हिड-१९ चा त्रास


कोव्हिड 19 याने जगभरात थैमान घातले आहे व भारतातही  त्याचा संसर्ग वाढतच चालला आहे, आपल्या आजूबाजूलाही आता आपण  कोरोनाच्या केसेस बघत आहोत.
कोव्हिड 19 या आजारावर बरेच संशोधन चालू आहे व रिसर्चमध्ये काही औषधे या आजारात उपयोगी पडताना दिसत आहेत, परंतु अजूनपर्यंत यावर रामबाण औषध नाही.   लसीवरही संशोधन चालू आहे; परंतु ती केव्हा उपलब्ध होईल हे आताच सांगता येणार नाही; पण  लवकरात लवकर गुणकारी व सुरक्षित अशी लस उपलब्ध होवो ही अपेक्षा आपण ठेवू.

आपणा सर्वांना माहीतच आहे की, कोव्हिड 19 हा प्रामुख्याने फुफ्फुसावर आघात करणारा जंतू आहे व त्यामध्ये सर्दी, खोकला, ताप, दम लागणे, अशक्‍तपणा येणे ही लक्षणे दिसतात. या आजारांमध्ये संसर्ग फार लवकर इतरांना पसरतो.

कोव्हिड 19 ची सर्वांनाच भीती वाटत आहे. परंतु, ज्या पेशंटना अस्थमा आहे, त्यांना त्याची जास्त भीती वाटते, त्यांच्या मनात बर्‍याच शंका आहेत व अशा बर्‍याच शंका अस्थमाच्या पेशंटकडून येतात. या प्रश्‍नांची उत्तरे येथे देण्याचा प्रयत्न करू; पण एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे कोव्हिड 19 हा आजार  नवीन आहे व  याबद्दलचा जो काही अभ्यास (संशोधन)आहे तो गेल्या काही महिन्यांतील आहे व यावर अजून बरेच संशोधन चालू आहे. त्यामुळे जी आजची रेकमेंडेशन्स आहेत ती पुढे बदलू शकतात हे सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे.

1) पेशंटला कोव्हिड19 होण्याचा धोका इतरांपेक्षा जास्त आहे का?


- जगभरात झालेल्या रिसर्चवरून असे दिसून येते की, अस्थमाच्या पेशंटला कोव्हिड-19 होण्याची रिस्क ही इतरांएवढीच आहे म्हणजे एखाद्याला अस्थमा म्हणजेच दमा आहे म्हणून त्याला कोव्हिड 19 लवकर होईल असे नाही; परंतु अस्थमाच्या पेशंटनी कोव्हिड 19 होऊ नये याची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या कोव्हिड -19 म्हणजेच  कोरोनाच्या साथीमध्ये सर्व अस्थमाच्या पेशंटनी त्यांचा अस्थमा कंट्रोलमध्ये ठेवणे हे अत्यावश्यक आहे. जर अस्थमा कंट्रोलमध्ये नसेल तर पेशंटला खोकला, दम लागणे ही लक्षणे होऊ शकतात व ही लक्षणे आल्यास जरी त्यांना कोव्हिड -19 नसला तरीही त्यांना खोकला व दम असल्याने कोव्हिड 19  संशयित म्हणून ट्रीटमेंट दिली जाऊ शकते व त्याचा विनाकारण त्रास पेशंटला होऊ शकतो. त्यामुळे त्यांची अस्थमाची  पूर्ण ट्रीटमेंट म्हणजेच इन्हेलर व इतर गोळ्या औषधे ही व्यवस्थित, न चुकता घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जर तुमचा अस्थमा कंट्रोलमध्ये नसेल व त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास (खोकला व दम) झाला तर तुम्हाला हॉस्पिटलच्या इमर्जन्सी विभागात जावे लागेल व तेथे इतर पेशंटची संपर्क होऊन तुम्हाला कोरोना होण्याचा धोका वाढू शकतो. यासाठी औषधे व्यवस्थित घेणे गरजेचे आहे.

अस्थमाच्या पेशंटनी  त्यांचा  अस्थमा आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे कारण, जर अस्थमा कंट्रोल नसेल तर त्यांना सर्दी, खोकला होत राहील व त्यामुळे त्यांच्या ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी त्यांना अडचण येऊ शकते किंवा त्यांना सुट्टी घ्यायला लागेल कारण आजकाल सर्दी व खोकला असणार्‍या लोकांकडे  इतर लोक संशयित नजरेने पाहतात.

2) जर अस्थमाच्या पेशंटला कोव्हिड 19  झाला तर त्याला जास्त धोका आहे का किंवा त्याला जास्त त्रास होईल का?


कोव्हिड 19 चा धोका  हा premorbid conditions म्हणजे ज्यांना इतर आजार आहेत उदा.- डायबेटिस, किडनीचे आजार, फुफ्फुसांचे आजार, कॅन्सर असे आजार असणार्‍या पेशंटला जास्त असतो म्हणजे या आजारांच्या पेशंटला जर कोव्हिड -19 झाला तर त्यांना गुंतागुंत व्हायची शक्यता जास्त आहे. या नियमाने अस्थमाच्या पेशंटला ही कोव्हिड -19 यांचा जास्त त्रास होऊ शकतो. परंतु, जर त्यांचा अस्थमा पूर्णपणे आटोक्यात असेल तर त्यांना कोव्हिड -19 चा त्रास हा  इतरांएवढाच होऊ शकतो. परंतु, जर अस्थमा आटोक्यात नसेल तर त्यांना कोव्हिड -19 झाला असताना जास्त त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे सिरीयस होण्याचा धोकाही वाढू शकतो.

अस्थमाच्या पेशंटला जरी कोरोना झाला तरीही त्याच्या ट्रीटमेंटबरोबर त्यांनी अस्थमाची  सर्व ट्रिटमेंट ( इन्हेलर, औषधे) चालू ठेवणे गरजेचे आहे. कारण ती ट्रिटमेंट थांबवली तर अस्थमा ची लक्षणे वाढून त्याचा त्रास होऊ शकतो. काही लोकांची अशी शंका असते की अस्थमाच्या औषधाने ( इन्हेलर, औषधे)  प्रतिकारशक्‍ती कमी होऊन कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढेल काय?  परंतु अस्थमाच्या औषधांनी अशी कोणतीही प्रतिकारशक्‍ती कमी होत नाही.

3)  आताच्या काळात अस्थमाच्या पेशंटला सर्दी, खोकला व ताप आल्यास काय करावे?


जर अस्थमाच्या पेशंटला या दिवसांमध्ये सर्दी, खोकला व  ताप आला तर सर्वात आधी त्यांनी स्वतःला विलगीकरण करणे गरजेचे आहे. त्यानंतर त्यांनी ताबडतोब त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणतेही सेल्फ मेडिकेशन करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गरज असेल तर पुढील योग्य टेस्ट कराव्यात.

अस्थमाच्या पेशंटला खोकला, दम लागला तर तो अस्थमाचा त्रास आहे की कोव्हिड 19  हे  सांगणे  तसे अवघड आहे. परंतु, यामध्ये काही घटक आपल्याला मदत करू शकतात ते म्हणजे ज्या व्यक्‍तीला असा त्रास होत आहे ती व्यक्‍ती कोरोनाबाधित व्यक्‍तीच्या संपर्कात आली आहे का? त्यांच्या कुटुंबात किंवा शेजारी कोरोना बाधित व्यक्‍ती आहे का?  सदर व्यक्‍ती कोरोना बाधित क्षेत्रातून प्रवास करून आली आहे का? त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, पोलिस, हे सर्व high risk  प्रवर्गामध्ये येतात.

वरीलपैकी घटक नसतील तर हा खोकला व दम हा अस्थमाचा असू शकतो. व जास्त ताप असणे खूप अशक्‍तपणा असणे घसा खवखवणे, दुखणे ही लक्षणे असल्यास मात्र कोरोनाची शक्यता पडताळून पाहिली पाहिजे. एक्स-रे  यामध्ये निदानास मदत करू शकतो, अशावेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे व सेल्फ मेडिकेशन टाळणे आवश्यक आहे.

4) अस्थमाचा पेशंटनी कोरोना टाळण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे?

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी इतरांप्रमाणेच आवश्यक असेल तरच घरातून बाहेर पडणे, बाहेर पडताना मास्कचा वापर आवश्यक आहे.  बाहेरच्या वस्तूंना स्पर्श टाळावा, हस्तांदोलन टाळावे, वारंवार हात धुणे व गरज असल्यास सॅनिटायझरचा वापर करणे, नाक तोंड व चेहर्‍यावर स्पर्श टाळणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, अशी काळजी घेऊन नक्‍कीच तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकाल.
त्याचबरोबर प्रतिकारशक्‍ती वाढवण्यासाठी योग्य आहार, योग्य झोप, विटामिन सी, विटामिन डी चा वापर करणे आवश्यक आहे.
 अशाप्रकारे अस्थमाच्या पेशंटनी घाबरून न जाता योग्य काळजी घेऊन स्वत:चे संरक्षण करणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments